मुंबई: देशाची अवस्था सध्या एक हत्ती आणि सात आंधळ्यांसारखी झाली आहे. हत्ती वर स्वार व्हायची कुणाचीही हिंम्मत नाही. सामान्य माणूस खितपत पडलाय त्याच्याकडे बघायला सरकारला वेळ नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी केलीय. सारस्वत बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम आज झाला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. कामं कुणी केलीत यावरून सध्या श्रेय घेण्याचं राजकारण सुरू आहे. भाजपवाले म्हणतात आम्ही काम केलं, तर काँग्रेसचे लोक म्हणतात ते काम आमच्या काळात झालं. या भांडणात लोकांचा जीव जातोय, पण त्यांच्याकडे बघायला कुणालाच वेळ नाही.
देशाची अर्थव्यवस्था खालावत चालली असल्याबद्दल त्यांनी चिंताही त्यांनी व्यक्त केली. सारस्वत बँकेने मदत केली त्यामुळेच शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिक निघू शकलं. बँकेने मदत केली नसती तर सामना निघूच शकला नसता अशी आठवणही त्यांनी सांगितली.
यावेळी शरद पवार यांनी सारस्वत बँकेच्या कामाचं कौतुक केलं. अतिशय कठीण काळात बँकेने उत्तम कामगीरी केली आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणाशिवाय हे काम शक्य नाही असंही ते म्हणाले. सारस्वत बँकेचं 23 हजार कोटींच कर्जवाटप असताना त्यांचा एनपीए मात्र एक टाक्यांपेक्षाही कमी आहे हेच या बँकेची प्रगती दर्शवते असंही पवार म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours