रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आईनंच पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या हत्येप्रकरणी पोफळीतील आरोपी राजेश्वरी पवारवर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपीला अटक केलीये. विक्रांत पवार असं मृत मुलाचं नाव आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई-मुलाच्या अतूट नात्याला या आईने एका क्षणात संपवलं. त्यामुळे ही आई की वैरी असा सवाल आता निर्माण होतो.

विक्रांतचा अपघात झाला असल्याची माहिती आरोपी राजेश्वरी पवार हिनं पोलिसांना दिली होती. मात्र मृतदेहाची पाहणी केल्यावर पोलिसांना विक्रांतच्या घातपाताचा संशय आला. त्यानंतरच्या चौकशीत हा अपघात नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं.

बऱ्याच तपासानंतर पोलिसांना विक्रांतच्या आईवर संशय आला. त्यांनी आई राजेश्वरीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अखेर आपणच मुलाला ठार मारल्याची कबुली आरोळी राजेश्वरी पवार हिने पोलिसांना दिली. या सगळ्याचा पोलिसांनाही मोठा धक्का बसला.

विक्रांत दारू पिऊन घरी असलेल्या लहान मुलीशी विक्षिप्त वागत होता. शिवाय घरच्यांना मारहाण देखील करत होता. त्यामुळे रागाच्या भरात आम्ही त्याला मारलं अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे याबद्दल आता आणखी तपास करत आहेत. त्याचबरोबर विक्रांतच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours