नाशिक, 11 ऑक्टोबर : बाजार समितीत भाजीपाला आवकमध्ये घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाला महाग झाला आहे. एकाच दिवसात भावात मोठा फरक झाला आहे. कालच्या तुलनेत आज भाज्यांचे भाव महागले आहेत.
- काल मेथीची जुडी 20 ते 22 रुपये होती, ती आज 30 ते 32 रुपये आहे.
- गावठी कोथिंबीर काल 35 रुपये होती, ती आज  65 रुपये झाली आहे.
- पालक काल 12 रुपये तर आज 20 ते 22 रुपये आहे
भाज्यांचे भाव असे अचानक महागल्याने नाशिकहून मुंबईला जाणारी भाजीपाला वाहतूक कमी झाली आहे. तर आता 2 दिवसात मुंबईतही भाजीपाला महागणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलनंतर भाज्यांमुळे खिसे रिकामे व्हायला सुरुवात झालीय.  ऐन नवरात्रीत भाज्यांचे दर कडाडले आहेत.
एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाला आहे. त्यातच आता शेतकरी वर्गापुढेही या महागाईने मोठी अडचण निर्माण केलीय. मागच्या ३ महिन्यात खतांच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्के एवढी दरवाढ झाल्यामुळे, अगोदरच दुष्काळाला तोंड देत असताना रब्बीची तयारी कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना रोखण्यात आलं. एकीकडे सरकार शेतीला प्राधान्य देत असलं तरी, पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे खतांच्या दरांवर अंकुश ठेवण्यास सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली सोडलं तर सर्वच जिल्ह्यात तब्बल २० टक्क्यांपेक्षा कमी-अधिक पाऊस झालाय. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय.
शिवाय येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पाणी नसल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसतोय. त्यातच ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेलच्या किमती रोजच वाढताहेत, त्याचप्रमाणे दुसरीकडे शेतकऱ्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या खतांच्या दरांनी मागच्या ३ महिन्यात मोठा उच्चांक गाठलाय.
आधीच यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. पावसामुळे पाणीटंचाईचं संकट ओढावलं आणि त्याचा थेट परिणाम शेतीवर झालेला पाहायला मिळतो. पाण्याअभावी भाज्यांचं उत्पादन कमी प्रमाणात झालं. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली.
लातूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याला परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या गारपीटीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटानं चिंतेत सापडलेल्या लातूरच्या बळीराजावर आता दुहेरी संकट कोसळलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours