कल्याण: मतदान ओळख पत्र अर्थात वोटर कार्ड तयार करुन घ्या. त्यात दुरुस्ती करुन घ्या असं आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्यानं केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागच्या बाजूला हजारो ओळखपत्रं सापडली आहे. त्यापैकी अर्धी ओळखपत्रं जळालेल्या अवस्थेत मिळून आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा प्रकार एका जागरुक नागरीकाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यात अशाप्रकारे ओळखपत्रं मिळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
एपीएमसीचा परिसर ४० एकर जागेचा आहे. याठिकाणी मोकळ्य़ा जागेत काही मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आढळून आला. त्यांनी जागरुक नागरीक आजम शेख यांना त्यांनी पाचारण केलं. या घटनेची खबर आजम यांनी पोलिसाना दिली. त्याठिकाणी बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली.
मिळून आलेली काही ओळखपत्रं ही कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी, दुधनाका, खडकपाडा अशा अनेक परिसरातील नागरीकांची असल्याचे त्यावरील पत्त्यावरुन दिसून येत आहे. अर्धे ओळखपत्रंही जळालेली होती. त्यात बहुतांश नावे ही मुस्लीम मतदारांची दिसून येत आहे.
मिळून आलेली ओळख पत्रं ही फेक आहेत की, ओरीजनल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फेक आहे, तर ती कोणी बनविली. त्याचे हे कृत्य उघड होण्याच्या बेतात असल्याने त्याने ती जाळली असावी.
मुस्लिम मतदारांची ओळखपत्रं जास्त असतील तर मुस्लिम विरोधी पक्षाकडून त्यांना मतदान मिळणार नाही म्हणून त्यांची ओळखपत्रं नष्ट करण्याचा हा प्रताप असावा.
ओळखपत्रं खरी असतील तर जाळून मतदारांच्या हक्कावर गदा आणणे. त्या प्रभागातील मते कमी करणे, जेणे करुन मतदानाच्या दिवशी त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येऊ नये या विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मतदान आवश्यक आहे. मतदानासाठी वोटर कार्ड आवश्यक आहे. तेच नसेल तर लोकशाहीचा हक्क कसा बजाविणार असा प्रश्न आहे. त्यासाठी या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे मतदार ओळखपत्र तयार करणारी यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours