सांगली, 17 ऑक्टोबर : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल आता मैदानात उतरला आहे. सांगलीतल्या महामेळाव्यात हार्दिक पटेलनं मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. फडणवीस सरकारनं आश्वासन न पाळल्यानं त्यांना घरी बसवण्याची वेळ आल्याचा घणाघात यावेळी हार्दिकनं केला.
या मेळाव्यावेळी त्याने मोदी-शाह जोडीवरही हल्ला चढवला आहे. सरकार समाजाच्या भावनांशी खेळणार असेल तर त्यांना पुन्हा डमरू वाजवायला पाठवावे लागेल अशी खरपूस  टीकाही  पटेलांनी केली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरुन केंद्र सरकार टोलवा टोलवी करीत असल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक यांनी केला. देशातील सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजासोबत खेळत असल्याचा आरोप हार्दिक पटेल याने केला.
सांगली जिल्ह्यात धनगर समाजाचे दोन मेळावे होत आहेत. त्यापैकी आरेवाडीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी एका मेळाव्याचं आयोजन केलं. तर दुसरीकडे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचाही मेळावा आहे. त्यामुळे दोन्ही मेळाव्यांना धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतात.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणास बसलेल्या हार्दिक पटेल यांची प्रकृती ढासळली होती. हार्दिकचं काही बरंवाईट झाल्यास मोदी- शहा यांना गुजरामध्ये जाऊन चहा-पकोडे विकण्यास भाग पाडू, असा इशारा त्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.
१४ दिवसांपासून उपोषणाला बसलेला हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली होती. हार्दिक पटेलला सोल सिविल रुग्णालयात  दाखल करण्यात आलं होतं. पाटीदार नेता नरेश पटेल यांनी हार्दिक यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मागे हटणार नाही असं हार्दिक पटेल म्हणाला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours