वर्धा: सरकारी दवाखाने चालवणं सोपं नसून, सरकार कोणाचंही असलं तरी दवाखान्यांची अवस्था तशीचं राहणार असल्याचं सांगत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिलाय. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थितीत होते.
सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरचं लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खा. दत्ता मेघे, आ. अरुण अडसड उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी राज्यातील दवाखान्याची परिस्थितीत किती बिकट आहे यावर भाष्य केलं. दवाखान्यात नर्स आहे तर डॉक्टर नाही , डॉक्टर आहे तर नर्स नाही आणि दोन्ही आहे तर औषध नाही आणि तिन्ही आहे तर मरायला कोण जाणार अशी स्थिती आली आहे. मी काही फडणवीस सरकारवर टीका करत नाही. मुळात वर्षांनुवर्षे सरकारी रुग्णालयाची अशीच अवस्था आहे. त्यामुळं सरकारी दवाखाने चालविणे इतके सोपे नाही. सरकार कोणाचही असलं तरी दवाखाने तसंच राहणार असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
तर जगातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours