मुंबई: लोकसभेच्या आगामी निवडणुकीत जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची शुक्रवारी मुंबईत चर्चा पार पडली. मात्र कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. राज्यातल्या दोनही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबतची ही पहिलीच बैठक होती. 2014 च्या लोकसभेच्या जागांपेक्षा राष्ट्रवादीला यावेळी जास्त जागा हव्या आहेत. मात्र अशा जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवलेली नाही. आधी मित्रपक्षांशी चर्चा करून मग अंतिम निर्णय घेऊ अशी काँग्रेसची भूमिका आहे. ही पहिलीच बैठक असल्यामुळं दोनही पक्ष एकमेकांवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करताहेत असं बोललं जातं.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, माणिकराव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद रणपिसे इत्यादी नेते उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलीय. दोन्ही पक्ष काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीत आहेत. तर आमची ताकद वाढली असं सांगत राष्ट्रवादीने 50 टक्के जागांवर दावा केलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours