मुंबई: अंधेरीमधील ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीनं दारूच्या नशेत मोठा गोंधळ घातला आहे. पोलिसांच्या विनंतीनंतरही या गोंधळ घालणाऱ्या तरूणीनं लिफ्टमधून उतरण्यास नकार दिला. त्यानंतर तरूणीने थेट स्वत:ची कपडेच उतरवले. ही तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याचीही माहिती आहे.

दारूच्या नशेत असलेल्या तरुणीने इमारतीच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितली. त्यानं सिगारेट आणायला नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस इमारतीत दाखल झाले. पोलीस तिला लिफ्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तिने पोलिसांसमोर कपडे काढून गोंधळ घातला.

नशेत गोंधळ घालणाऱ्या या तरुणीनं आता उलट पोलिसांवरच आरोप केले आहेत. ‘माझी कुठलीही चूक नसताना मध्यरात्री तीन वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलीस येतात, हेच मुंबई पोलीस आहेत का? सोबत महिला कॉन्स्टेबलही नव्हती. संध्याकाळी सातनंतर महिलांना पोलीस घेऊन जाऊ शकत नाही, हा कायदा आहे,’ असं या तरुणीनं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या तरुणीने आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही केस दाखल केलेली नाही. सध्या दोन्ही पक्ष ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours