भंडारा  दि. 28:- गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते म्हणून मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी. शासनाने आपल्यासाठी गोवर-रुबेला ही लस मोफत उपलब्ध करुन दिली  आहे. या मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घेवून आपल्या मुलामुलीस ही लस टोचून घ्यावी व 100 टक्के मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले. 
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, भंडाराद्वारे गोवर आणि रुबेला पासून बालकांचे रक्षण करणा़ऱ्या गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 28 नोव्हेंबर 2018 रोजी महर्षी  ज्ञान मंदिर येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, डॉ. माधूरी थोरात, आयएमएचे डॉ. अशोक मेश्राम, महर्षी ज्ञान मंदिरच्या प्राचार्य, जि.प. सदस्य यावेळी उपस्थित होते.  यावेळी  मान्यवरांच्या हस्ते गोवर-रुबेला लसीकरणाबाबत बालकांना प्रमाणपत्र देण्यात आले. 
डॉ. मेश्राम यांनी  रुबेला-गोवर लसीकरण मोहिमेबाबत माहिती देतांना सांगितले की, या मोहिमेचा उद्देश मुलांना  गोवर-रुबेला पासून संरक्षण देण्यासाठी आहे. गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी 9 महिने ते 15 वर्ष् वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे कोणताही परिणाम होत नाही. अपवादात्मक दुखणे किंवा ताप येवू शकतो. मुलांना काही त्रास झाल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. गोवर-रुबेलाच्या लढाई असून आपण योध्दा आहोत, असे त्यांनी सांगितले.  गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होवू नये म्हणून बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, गोवरमुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण आणि जन्मजात रुबेला पिडित संभाव्य रुग्ण कमी करणे व जास्तीत जास्त बालकांना लसीकरण करुन 100 टक्के उद्दिष्ट गाठणे हे यामोहिमेचे लक्ष आहे. सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सर्व शासकीय रुग्णालय, अंगणवाडी केंद्र व मदरसा येथे ही लस देण्यात येत आहे. बालकांना ही लस प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून टोचली जाणार आहे, असेही ते म्हणाले.  
 प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महर्षी ज्ञान मंदिराच्या विद्यार्थींनीनी समुह गान म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमास महर्षी ज्ञान मंदिर शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours