कोल्हापूर: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यास बिद्रे कुटुंबीयांनी विरोध केला आहे.
अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद ब्रिदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत तर या हत्या प्रकरणातील दुसरा संशयित राजेश पाटील हा सुद्धा जळगावचा असून तो माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. शिवाय निकम हे पोलिसांच्या विरोधात केस लढणार नाही असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या हातात ही केस दिल्यास त्याचा फायदा आरोपीना होण्याची शक्यता राजू गोरे यांनी व्यक्त केली.
या हत्या प्रकरणात तपास अधिकारी असलेले एसीपी अजय कदम यांचे आणि संशयित आरोपीचा भाऊ संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध असल्याने त्यांनाही या केस मधून हटवून संगीता अल्फान्सो यांच्याकडे ही केस पूर्ववत देण्याची मागणीही राजू गोरे आणि आंनद बिद्रे यांनी केली.
काय आहे प्रकरण
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील होत्या. एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. पण त्यानंतर बिद्रे या बेपत्ता होत्या. त्यानंतर पोलीस तपासात त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय.
हत्येनंतर शरीराचे तुकडे करुन खाडीत फेकले
अश्विनी बिद्रे यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. शरीराचे तुकडे एका पिशवीत भरून वसईतील खाडीत टाकून देऊन विल्हेवाट लावली.
राजेश पाटीलची झाली चौकशी
अश्विनी बिद्रे प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश पाटील याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजेश हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.
राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं तपासात समोर आलं. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं. कुरुंदकरांच्या सीडीआरवरून हे निष्पन्न झाले. बेपत्ता प्रकरणात राजेश पाटील यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पण राजेश पाटील याला अटक नाही तर चौकशीसाठी नेल्याचा पोलिसांनी खुलासा केला होता. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी नेले होते
Post A Comment:
0 comments so far,add yours