बीड, 24 नोव्हेंबर : अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया तथा बाबूजी यांचे वयाच्या ८१व्या वर्षी शुक्रवारी रात्री १०.४५ वा. अंबाजोगाई येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक या त्यांच्या मुख्यकार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे
बाबूजी यांच्या कार्यकतृत्वावर जर नजर टाकली तर त्यांनी राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनात राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपुर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचवले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता.
मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्या महिलांना आधार दिला. गरिब आणि निराधारांचाही ते आधार होते. एवढंच नाही तर किल्लारी भूकंपाच्या काळात त्यांनी आपल्या सहकार्या सह दिवसरात्र काम करून या भागातील पिडीतांचे नव्याने संसार उभा केले आहे. बाबुजी यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली असून न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना आता व्यक्त होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours