मुख्य सपादिका.. सुनिता परदेशी
मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत ‘चटणीसाठी’ तयार राहा
देवानंद पवार यांचा सरकारला इशारा

घाटंजी : दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतक-यांच्या तोंडची चटणी भाकर हिरावली. त्यामुळे शेतकरी भाकरीचे दान करून मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा देत आहेत. आता मागण्या मान्य न केल्यास येत्या निवडणुकीत शेतकरी शिल्लक ठेवलेली चटणी वापरतील. साखर तुप खाणा-यांना हि चटणी सहन होणार नाही असा इशारा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिला. घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा यासह विवीध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अ‍ॅड विजयाताई धोटे, माजी जि.प.सदस्य मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, किरण कुमरे, माजी पं.स.सभापती शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना देवानंद पवार म्हणाले की, शेतक-यांना गोड गोड स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेत आले. मात्र आता शेतक-यांना मुर्ख समजुन केवळ आश्वासनांची गाजरे दाखविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान होऊनही सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून तालुक्याला वगळले. ऐन दिवाळीतच शेतपिकांची उलंगवाडी करण्याची दुर्दैवी वेळ यावर्षी शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यात चांगली पिके झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वप्नात पाहिले का असा खडा सवालही पवार यांनी यावेळी केला. जंगली जनावरांमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी नुकसान भरपाई शेतक-यांना कोणत्याही अटीशिवाय मिळावी अथवा त्यासाठी विशेष विम्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी अ‍ॅड विजयाताई धोटे, यशवंत इंगोले, मिलिंद धुर्वे यासह मान्यवरांनी आपल्या भाषणातून सरकारला चांगलेच धारेवर धरले. 
दरम्यान शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या चटणी भाकर मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी चटणी भाकर घेऊन सहभागी झाले होते. आदिवासी दंडारीत पारंपारिक वेशभुषेत केलेल्या नृत्यांमुळे मोर्चाने घाटंजीकरांचे लक्ष वेधले. तहसिल कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शेतक-यांनी मोठ्या टोपल्यात भाकरी गोळा करून तहसिलदार हामंद यांच्या स्वाधिन करण्यात आल्या. हे भाकरींचे दान मुख्यमंत्र्यांना पोहचविण्याची विनंती शेतक-यांनी यावेळी केली. 
घाटंजी तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषीत करावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करून त्यांच्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत द्यावी, भारनियमन पुर्णपणे बंद करावे, कृषीपंपांचे संपुर्ण वीजबिल माफ करावे, सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, अरूणावती, वाघाडी, गोकी, चोरकुंड, जांब, झटाळा व घोटी प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन व न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या मोर्चासाठी शालीकबाबु चवरडोल, संजय डंभारे, सैय्यद रफिक बाबु, संजय पाटील निकडे, सैय्यद छब्बु, गजानन पाथोडे, भारत बनसोड, आप्पाजी मांडवकर, बुधाराम दडांजे, धनराज पवार यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. संपुर्ण घाटंजी तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी चटणी भाकर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.


















Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours