हिंगोली: मुलीला लग्नाची मागणी घातल्यानंतर लग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या तिच्या पित्याची मुलाकडच्यांनी गुप्तीने वार करून हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे घडली. यावेळी बचावासाठी मधे पडलेल्या त्याच्या भावालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सेनगांव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रूक येथील सचिन नारायण सुरनर यांने गावातील अमोल कैलास शिंदे यांच्या बहिणीस लग्नाची मागणी घातली होती. मात्र, सचिन सुरनर हा व्यसनाच्या आहारी गेलेला असल्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सचिन सुरनर आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीचे वडील कैलास माणिकराव शिंदे ( वय ४५ ) यांना गावातील हातपंपाजवळ गाठले आणि मुलगी का दिली नाही अशी विचारणा करत त्यांच्या पोटात गुप्तीने वार केले. यात
कैलास शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी शिंदे यांच्या बचावासाठी धावलेला त्यांचा भाऊ भुजंग धोंडबाराव शिंदे याच्यावरही मुलाकडच्यांना प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं. भुजंग शिंदे यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर कैलास शिंदे यांचा मृतदेह हिंगोली शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.
याप्रकरणी अमोल कैलास शिंदे यांच्या तक्रारीवरून सेनगांव पोलिसांनी सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे, गणेश नामदेव कवडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 


Post A Comment:
0 comments so far,add yours