मुंबई: मुंबई पोलिसांनी #MeToo बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या सेलिब्रेटिंवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत, त्यांना यापुढे आपल्या कार्यक्रमात न बोलावण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षकांकडे याबाबतची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांकडून दरवर्षी ‘उमंग’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सदेखील हजेरी लावतात. परंतु ज्या कलाकारांवर महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, त्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा मोठा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला. ‘उमंग’ हा कार्यक्रम पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होत आहे. 

भारतात #MeToo मोहिमेला सुरूवात झाली आणि एकच खळबळ उडाली. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. अनेक कलाकारांची चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली. आता अशा कलाकारांना मुंबई पोलिसांनीही धक्का दिला आहे. 

दरम्यान, #MeToo चळवळीमध्ये आतापर्यंत नाना पाटेकर, आलोक नाथ, सुभाष घई, कैलाश खेर, रजत कपूर, विकास बहल, श्याम कौशल यांच्यासह अनेकांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लागलेत. नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर या मोहिमेला भारतात सुरूवात झाली. तनुश्रीच्या बाजूनं प्रियांका चोप्रा, परिणिती चोप्रा, स्वरा भास्कर, ऋचा चड्डा यांनी ट्विट केलं.

दुसरीकडे, Metoo मोहिमेला बॉलिवूडमधल्या ११ महिला दिग्दर्शिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच यापुढे लैंगिक छळाचे आरोप सिद्ध झालेल्यांसोबत काम न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने ट्विटरवरुन ही माहिती दिली. रुची नारायण, सोनाली बोस, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कगटी, किरण राव, मेघना गुलजार, अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे आणि झोया अख्तर या ११ महिला दिग्दर्शिकांनी #Metoo मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours