मनमाड, 10 डिसेंबर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आरपीआयने मनमाड बंद पुकारला आहे. या बंदला मनमाडमधून उस्फुर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. पण ऐन कामाच्या दिवसात कडकडीत बंद असल्याने बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
रामदास आठवले यांना शनिवारी रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रवीण गोसावीवर मुंबईच्या जे .जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. रिपाइंच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. तसंच तो अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली ती प्रवीणला पटत नव्हती. या रागातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला होता.
वाढत्या लोकप्रियतेमुळे हल्ला-आठवले
माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केली. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यानं हा प्रकार घडल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
तर एकीकडे नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे. संविधान संपवायला निघाले त्यांच्या बरोबर राहायलं तर आंबेडकरी विचार धारेवर चालणाऱ्या लोकांना राग येणारच, आता आठवले यांना यातून सबब मिळाली असेल असा टोला माजी खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.
केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भारिपने प्रकाश आंबेडकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. गल्ली बोळातील नेत्यांवर असे छोटेमोठे हल्ले होतच राहतात असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते लातूरमध्ये बोलत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours