बीड: संविधान संपवायला निघाले त्यांच्या बरोबर राहायलं तर आंबेडकरी विचार धारेवर चालणाऱ्या लोकांना राग येणारच, आता आठवले यांना यातून सबब मिळाली असेल असा टोला माजी खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.
अंबरनाथमध्ये शनिवारी रामदास आठवले यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला होता. या प्रकरणी नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया देताना आठवलेंना सल्लावजा टोला लगावला.
रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या प्रकारे संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि संघाकडून सुरू आहे. त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांना राग येणे हे साहजिकच आहे असं नाना पटोले म्हणाले.
तसंच आठवले यांच्यावर हल्ला झाला याचं मी समर्थन करणार नाही. पण रामदास आठवले यांनी समजलं पाहिजे की, जे संविधान संपवायला निघाले त्यांच्यासोबत राहिलं नाही पाहिजे याची सबब त्यांना यातून मिळाली असेल असा टोलाही त्यांनी लगावला.
जे संविधान संपवायला निघाले त्यांचे असेच हाल होणार याचं चित्र आतापासूनच दिसायला लागलं आहे असंही पटोले म्हणाले.
दरम्यान, रामदास आठवले यांना शनिवारी रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रवीण गोसावीवर मुंबईच्या जे .जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. रिपाइंच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. तसंच तो अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली ती प्रवीणला पटत नव्हती. या रागातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला होता.
वाढत्या लोकप्रियतेमुळे हल्ला-आठवले
माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केली. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यानं हा प्रकार घडल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours