मुंबई: राष्ट्रवादीच्या महिला माजी खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदीता माने यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. या आधी त्यांच्या मुलाने सेनेत प्रवेश केला होता.
आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेना भवनात निवेदिता माने यांनी शिवबंधनाचा धागा हातावर बांधला. निवेदिता माने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्याला सुरूंग लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी जवळीक साधल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.
याआधी निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील याने मागील महिन्यात 28 नोव्हेंबर रोजी 'मातोश्री'वर जाऊन सेनेत प्रवेश केला होता.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने कुटुंबाची नाळ ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली होती. पण हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्यानं माने कुटुंब नाराज होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, रुकडी, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी यापूर्वी दोनदा हातकणंगले मतदारसंघात खासदारपद भूषवलंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours