हि एका नव्या क्रांतीची सुरूवात व्हावी - रविकांत तुपकर
घाटंजी : सरकार कोणतेही असो शेतक-यांची आजवर हेटाळणीच झाली. मात्र यापुढे हे सहन केल्या जाणार नाही. शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची दुर्दैवी ओळख जगभरात आजवर झाली आहे. मात्र आता दुष्काळ परिषदेच्या माध्यमातून शेतक-यांच्या समस्यांना बुलंद आवाज मिळावा आणि हि परिषद एका नव्या क्रांतीची सुरूवात ठरावी असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. पारवा येथे आयोजीत संकटग्रस्त शेतक-यांची दुष्काळ परिषद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले, जंगली जनावरांपासून शेतक-यांच्या पिकांना संरक्षण मिळाले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांप्रमाणे विदर्भातील शेतक-यांनीही कापुस व सोयाबीन या पिकांच्या भावासाठी लढा देणे आवश्यक आहे. सरकार कोणतेही असो शेतकरी नेहमीच फसविल्या गेला आहे. मात्र भाजप सरकारने शेतक-यांना पुर्णपणे उध्वस्त केले आहे. घाटंजी तालुक्यात शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने संकटग्रस्त शेतक-यांना एकत्रीत करून एका नव्या क्रांतीपर्वाला सुरूवात केली आहे असे तुपकर यावेळी म्हणाले. 
दरम्यान परिषदेचे उद्घाटन रविकांत तुपकर यांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवून करण्यात आले. अध्यक्षस्थानी शेतकरी सुकाणू समितीच्या नेत्या सुशीला मोराळे होत्या. यावेळी व्यासपीठावर सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक किशोर ढमाले, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार अ‍ॅड. विजया धोटे, परिषदेचे संयोजक सचिन पारवेकर, मिलिंद धुर्वे, किरण कुमरे, सुहास पारवेकर, स्वामीबाबु काटपेल्लीवार, शैलेश इंगोले, रूपेश कल्यमवार, रूद्र पाटील, शालीक बाबु चवरडोल, संजय निकडे, संजय डंभारे, सय्यद रफिक बाबु, मदन जिड्डेवार, अभय कथ्थेवार, पोचारेड्डी जिड्डेवार, गंगय्या बदीवार, मिलिंद पाटील शिंदे, भिकु पाटील चव्हाण, गजानन पाथोडे, सैय्यद छब्बु, संजय आरेवार, रमेश आंबेपवार, भगवान सकनवार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुशीला मोराळे म्हणाल्या की सध्या देशात इंडीया विरूद्ध भारत अशी स्पर्धा सुरू आहे. मेक इन इंडीया, स्टार्ट अप इंडीया, डिजीटल इंडीया सारख्या भुरळ पाडणा-या फसव्या योजनांनी शेतक-यांचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देश आणि राज्यात सामाजिक दरी निर्माण करून विकासाच्या प्रश्ना ऐवजी मंदिर मस्जिद वाद पेटवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी व सामान्य जनतेने त्यांचे प्रश्न उचलणारे देवानंद पवार यांच्या पाठिशी उभे राहावे आम्हीही पुर्ण ताकदीने त्यांना साथ देऊ असे आश्वासन मोराळे यांनी दिले. 


शेतक-यांनी एकदाचा मटका किंग रतन खत्रीवर विश्वास ठेवावा मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफीचे आकडे व आश्वासनांवर ठेवू नये अशी खोचक टिका सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी केली. 
परिषदेचे निमंत्रक व शेतकरी नेते देवानंद पवार म्हणाले की यापुढे शेतक-यांच्या कार्यक्रम व आंदोलनात मेणबत्तीने दिपप्रज्वलन न करता मशाली पेटविण्यात येतील. शासनाने या कृतीतून शेतक-यांची भावना समजुन घ्यावी असे ते म्हणाले. जंगली जनावरामुळे झालेल्या नुकसानासाठी नुकसान भरपाई सोबतच स्थानिक वनाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यात सर्वत्र सारखाच दुष्काळ पडलेला असूनही शासनाने ठरावीकच तालुके दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत संपुर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत न केल्यास यासाठी सरकारला न्यायालयात खेचण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


या परिषदेत शेतक-यांच्या विवीध मागण्यांबाबत ११ ठराव घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण पिक विमा, वन्यप्राणी हल्ल्यात ठार झाल्यास २५ लाख व जखमींना ५ लाखांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, जंगली जनावर शेतात घुसणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यावी व शेतात घुसलेल्या जनावरांना ठार मारण्याची परवानगी शेतक-यांना द्यावी, जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहिर करावा, कृषिपंपांचे लोडशेडींग त्वरीत बंद करावे, यवतमाळ येथिल साहित्य संमेलनाला ५० लाख देण्या ऐवजी ते शेतक-यांसाठी खर्च करावे, सरसकट पिकविमा लागू करावा, राज्यात सरसकट कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी करावी, अतिक्रमण धारकांना शेतीचे पट्टे द्यावे, सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतक-यांना पेंशन योजना लागू करावी असे ठराव घेण्यात आले.   पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने न करता पहाटी लावलेल्या तुरीच्या पेंडके देऊन करण्यात आले. तत्पुर्वी लोकशाहीर नागोराव गुरनुले यांनी आपल्या गीतांतून शेतक-यांच्या कष्टाचे पोवाडे गायले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पारवेकर, संचालन हेमंत कांबळे तर आभार प्रदर्शन रूपेश कल्यमवार यांनी केले. या परिषदेसाठी घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. सुमारे १० ते १२ हजार शेतकNयांनी या परिषदेला गर्दी केली होती. कार्यक्रमातील शेतकNयांची लक्षणीय उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours