बीड : शेतकऱ्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले, पण कर्ज माफ झाले नाही. हे बीडमधील वास्तव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अवघ्या पाच तासांत या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं समोर आलं आहे.

धारूर तालुक्यातील अंजनढोह येथील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ सोळंके यांच्या बँक खात्यात संध्याकाळी कर्जमाफीचे पैसे थेट जमा करण्यात आल्याचं भारतीय स्टेट बँकच्या व्यवस्थापकांनीच सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 98,995 रुपये तत्काळ जमा करुन कर्ज खाते बंद करण्यात आल्याची कबुलीही बँक व्यवस्थापकांनी दिली आहे.

विशेष म्हणजे,उद्धव ठाकरे आज एकदिवसाच्या मराठवाड्याच्या दुष्काळा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याला भरसभेत उभं करून कर्जमाफीचे पैसे न मिळाल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्टीकरणही दिले होते. 'बाळासाहेब हरिभाऊ सोळंके या शेतकर्‍याचं कर्ज खाते क्रमांक 33817369657 असे आहे. हे स्टेट बँकेतील खाते असून, त्यांनी 2014 मध्ये कर्ज घेतलं होतं. पुढे हे खाते एनपीए झालं. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

'पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले होते. त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. शासनामार्फत ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे', असंही सुभाष देशमुख यांनी सांगितलं होतं.

तर दुसरीकडे, 'उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझे कर्जमाफ झाले. आज संध्याकाळी ठीक 7.46 वाजता मला फोन करून कर्जमाफ झाल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली', असं बाळासाहेब सोळंके यांनी सांगितलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours