मुंबई: मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशात चक्क भाजपच्या पोस्टरवर झळकत असल्याचं समोर आलं आहे. जोनपूरमध्ये कृपाशंकर सिंहांची छबी भाजपच्या मंत्र्यांसोबत पोस्टर्सवर विराजमान झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कृपाशंकर मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तसंच कृपाशंकर सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीकही वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा भाजप आपल्या गळाला लावणार का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कृपाशंकर सिंह उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, संजय निरुपम यांनीही उमेदवारी दाखल केल्यास नव्या वादाची चिन्हं आहेत. अशातच यूपीतला जोनपूर मतदारसंघ कृपाशंकर सिंहांसाठी प्लॅन बी असावा असा कयास आहे.

दरम्यान, काँग्रेसनं लोकसभेसाठी त्यांचे उमेदवार जाहीर करायला सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलिंद देवरा तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून एकनाथ गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंबई आणि उपनगरातल्या लोकसभा मतदार संघाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबईतल्या 6 पैकी 5 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours