जळगाव, 27 जानेवारी : 'ईव्हीएम हॅकिंगबद्दल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली,' असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने केला होता. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या भाजपने हॅकर खोटारडे असतात असं म्हटलं. पण आता याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षाला अर्थात भाजपला खोचक सवाल विचारला आहे.
'हॅकर खोटारडे असतात तर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला,' असा सवाल करत माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्वपक्षाला खिंडीमध्ये पकण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत 'सरकारनामा' या मराठी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.
एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात फोनद्वारे बोलणं झाल्याचा दावा एका हॅकरने केला होता. या आरोपानंतरच खडसेंचं मंत्रिपद अडचणीत आल्याचं बोललं जातं.
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू आणि हॅकरचे आरोप
ईव्हीएम हॅकिंगबद्दल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने केला आहे. लंडनमध्ये त्याने गुप्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने भारतात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, असा दावा केला आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना याबद्दल माहिती होते. त्यामुळे दिल्लीत कार अपघातात त्यांची हत्या करण्यात आली होती, असा दावाही त्याने केला.
सय्यद शुजाने अनेक खळबळजनक दावे केले आहे. 2014 ची लोकसभेची निवडणूक ही फिक्स होती, असा आरोपही त्याने केला. तसंच 'माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहे आणि मी ते दाखवू शकतो', असा दावाही त्याने केला.
'दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोळ होणार होता. तेव्हा भाजपच्या आयटी सेलकडून ट्रांसमिशन सापडले होते. त्यामुळे ते वेळीच रोखता आले. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्यात', असा दावाही त्याने केला.
अलीकडेच झालेल्या राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकही भाजप जिंकली असती. परंतु, आमच्या टीमने या राज्यात भाजपकडून ट्रांसमिशन हॅक करण्याचा डाव हाणून पाडला, असा दावाही त्याने केला.
ईव्हीम मशीन तयार करणाऱ्या टीममध्ये आपण होतो. त्यामुळे ही मशीन कशी हॅक करायची हे मला माहिती आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास त्यांना दाखवू शकतो, असं आव्हानच त्याने दिलं.
काही दिवसांपूर्वीच शुजा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यामुळे त्याने लंडनमध्ये गुप्तपणे पत्रकार परिषद घेतली. शुजा हा आधी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता. त्याने 2009 ते 2014 च्या काळात काम केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours