मुंबई : राजकारणात असं एकही घराणं नाही जिथे भांडणं नाहीत. सगळ्याच ठिकाणी कुरबुरी सुरू असतात मात्र फक्त मुंडे कुटुंबाचीच चर्चा जास्त होतं अशी खंत व्यक्त केलीय बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी. निमित्त होतं 'न्यूज18 लोकमत'च्या न्यूज रूम चर्चा या कार्यक्रमाचं. धनंजय मुंडे आणि त्यांच्या नात्याबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपल्य मनातली सल बोलून दाखवली.
पंकजा मुडे म्हणाल्या, "आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं. एवढं सगळं देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. तो जर भाजपमध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं. पण आता आमचे मार्ग वेगळे आहे." अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी फक्त माझ्याच खात्यावर आरोप केले त्याचं दु:ख आहे. त्यांच्या कुठल्याही आधार नसलेल्या आरोपांमुळे माझ्यावर भ्रष्टाचाराचे डाग उमटले असंही त्यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही. सीबीआय आणि पोलिसांनी तो केवळ अपघात होता असं स्पष्ट केलं होतं. आणि मला सीबीआय आणि पोलिसांवर विश्वास आहे.
शिवसेनेसोबत युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे. आम्हाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घ्यायचं आहे. मला खात्री आहे की राज्यात युती होणारच.
मी मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही इच्छा व्यक्त केली नाही. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. राजकारणात मी माझ्या पद्धतीने काम करत जाते. मी कुणाशीही स्पर्धा करत नाही.
मी पुढच्या वेळी मंत्री असेन की नाही हे सांगता येत नाही असं म्हटलं नव्हतं तर बालविकास हे खातं असेन की नाही असं म्हणाले होते. कारण पुन्हाही आमचीच सत्ता येणार असल्याने त्या वेळी कुठलं खातं मिळेल हे सांगता येत नाही असा त्याचा अर्थ होता. कारण कुणाला कुठलं खातं द्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.
मुख्यमंत्री आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये उत्तम संवाद आहे. कुठल्याही बातम्यांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.
धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र तो केंद्राच्या अखत्यारितला विषय आहे. धनगरांचं आरक्षणही कायद्याच्या चौकटीत बसावं यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्यासाठी बांधील आहोत.
प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची का एवढी चर्चा होते तेच कळत नाही? त्या आधीही राजकारणात होत्याच. प्रचारही करत होत्या. त्यामुळे त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. महिला राजकारणात येणार असल्याने त्याचा फायदा समाजाला होत असतो. एक महिला राजकारणात येत असेल तर त्याचं स्वागतच आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours