मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यातल्या भाजपच्या खासदारांसोबत विभागवार बैठका घेतल्या. यात राज्यातल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. सर्व खासदारांनी आपलं मत मांडलं तर मुख्यमंत्र्यांनी आपलं आकलन सांगितलं. लोकसभा निवडणुकीआधी युती झाली नाही तर परिस्थिती जड जाईल अशी चिंता अनेक खासदारांनी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

या बैठकीदरम्यान भाजप खासदार, आमदार तसंच पदाधिकाऱ्यांनी  चिंता व्यक्त केली 2014 सारखी परिस्थिती नसल्यानं युती न झाल्यास त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असा फिडबॅक मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीसाठी राज्यात भाजप आग्रही आहे. तर शिवसेनेने आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवलाय. तर तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले अनेक उमेदवार निश्चितही केले आहेत.

पडद्यामागच्या हालचाली

लोकसभा निवडणुकींना आता फक्त चार महिने राहिले आहेत. महाराष्ट्रात युतीबाबात अजुन संभ्रम असतानाच आघाडीने आपले उमेदवारही फायनल केले आहेत. भाजप आणि सेनेचे नेते उघडपणे एकमेकांवर टीका करत असताना पडद्यामागून हातमिळविण्यासाठी हालचालीही सुरू आहेत.नेत्यांची वक्तव्य आणि वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युतीची बोलणी करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेले जावडेकर यांना युतीची जडणघडण उत्तम प्रकारे माहित आहे. त्याचबरोबर जावडेकर यांचा स्वभाव हा शांत आणि संयमी असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची शक्यता आहे.

भाजप आणि सेनेचे संबंध ताणल्याने युतीबाबात शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी आक्रस्ताळ्या नेत्याची नाही तर थंड डोक्याने विचार करणाऱ्या नेत्याची भाजपला गरज होती. त्यातून जावडेकरांचं नाव पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे युतीचा गाडा किती पुढे सरकतो हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. असं असतानाच सेना आणि भाजपच्या नेत्यांमधली टीका थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.

शिवसेनाच मोठा भाऊ

शिवसेनेच्या खासदारांची बहुचर्चित बैठक सोमवारी मुंबईत झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं. खासदार संजय राऊत यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली. शिवसेनेच्या या बैठकीनंतरही युतीबाबत शिवसेनेने संदिग्ध भूमिकाच दिसून आली. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि यापुढेही राहिल असं संजय राऊत यांनी वारंवार सांगत शिवसेनेची भूमिका अजुनही नरमलेली नसल्याचेच संकेत दिलेत.

जवळ आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि भाजपकडून वारंवार दिला जाणारा युतीचा प्रस्ताव यामुळे शिवसेनेच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही दिली जात होती. मात्र भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेना दिल्लीचं तख्त हलवेल असंही त्यांनी सांगितलं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours