भंडारा दि.9 :-  केंद्र सरकारचा  मुख्य उद्देश आयुष पॅथींना मुख्य प्रवाहात आणणे हा असून जुनाट व असाध्य आजारांवर आयुष पॅथीद्वारे उपचार उपलब्ध करुन देणे असा आहे. आजच्या युगात सर्व पॅथींचे आपले वेगळे महत्व व स्थान आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरजु रुग्णास आरोग्य सेवा  प्राधान्याने उपलब्ध करुन दयावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. 
आयुष विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडाराद्वारे मोफत रोगनिदान व उपचार शिबीर जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नुकताच आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, श्रीमती शेख, तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
या वर्षीचे शिबीर वैशिष्टयपूर्ण होते, यामध्ये आयुवेद, होमीयोपॅथी, योग व निसर्गोपचार या आजारावर आयुष पध्दतीने उपचार करण्यात आले. सदर शिबीरात एकूण 219  रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात आयुर्वेदाद्वारे 90, होमीयोपॅथी-32, योगाद्वारे- 75 तसेच युनानी पध्दतीने 22 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 
प्रास्ताविकात बोलतांना डॉ. प्राची पातुरकर यांनी आयुष म्हणजे काय यावर सविस्तर माहिती दिली. या शिबीराचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेस आयुष् पध्दती विषयी माहिती देणे व आयुष सेवांचा लाभ रुग्णांना देवून आयुष पध्दतीचा प्रसार व प्रचार होणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमाचे संचलन माधुरी ठोंबरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनिषा लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आयुष विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours