भाईंदर: मीरा भाईंदरमधील प्रेम नगरमध्ये महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांटमधील गटाराची सफाई करण्यासाठी 5 मजूर उतरले होते. त्यावेळी गटारातील विषारी वायूच्या संपर्कात तीन जण आले, असता तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 2 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. हे कामगार कंत्राटी मजूर असल्याचं सांगितलं जात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या 11 एसटीपीचे पूर्ण बांधकाम झालेले आहे. जवाहरलाल नेहरू अर्बन मिशन मधलं हे काम आहे. साधारणतः पूर्ण काम झालेलं होतं आणि पूर्ण वापरात आणण्याची चाचणी सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली. त्यामध्ये जे गटार साफ करीत होते, तो उघडा गटार होता. तो भुमीगत गटार नव्हता.
या गटावर जे झाकण टाकले होते, ते त्यांनी पूर्ण काढून साफ करायला पाहिजे होते. पण त्यावरील झाकण काढून एक जण खाली उतरला, तेव्हा त्याचा श्वास गुदमरला. त्यावेळी दुसरा त्याला वाचवायला गेला, असे तिघे एकमेकांना वाचवायला गेले आणि त्यात तिघांचाही मृत्यू झाला. हे सगळे खासगी कंत्राटी कामगार होते.
ज्या गटारामध्ये ही घटना घडली तो पावणे दोन मीटर खोलीचा होता. सिमेंट कॉंक्रिटमध्ये काम केलेलं आहे. तो बरेच दिवस बंद असल्यानं त्याच्यात वायू साचला होता. या प्रकरणी ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता वाकोडे यांना दिले असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours