नाशिक : 'युतीची चर्चा जोरात सुरू आहे, दहीहंडीत अनेक थर असतात. त्यामुळे युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावर हे उद्या दिल्लीत ठरेल', असं सुचक वक्तव्य शिवसेनेच्या युवासेनेचं अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते. 
नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात म्हाडाच्या मुक्तछंद महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं आहे. या कार्यक्रमाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, विनोद घोसाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "दहीहंडीच्या खेळात एक टीम असते. एकमेकांवर विश्वास असतो. आम्ही कोणत्या थरावर राहणार आहोत. हे तुमच्यावर (मधू चव्हाण) उद्या दिल्लीत ठरणार आहे. आमचे काही वाद किंवा मतभेद झाले असतील. त्याबद्दल मी काही स्पष्टीकरण देणार नाही."
यावेळी आदित्य ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजीही केली." मधू चव्हाण हे माझ्याबाजूला बसलेले आहे. आम्ही अनेक कार्यक्रमांना कधी-कधी सोबत असतो. त्यांनी मला आज गुलाबाचे फुल दिले आहे. उद्या ते भगवे होणार आहे. पण ते अजून कमळाबद्दल काही बोलले नाही", असा टोलाही त्यांनी लगावला. 
दिल्लीत उद्या शुक्रवारी भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours