मुंबई, 03 जानेवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानाच्या अग्रलेखातून खरमरीत टीका केली आहे.
पंतप्रधानांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राम मंदिर निर्माणासाठी मोदींकडे सरदार पटेल यांच्यासारखी हिम्मत नाही आहे असं सांगून शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
सामना अग्रलेख
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. मुलाखत वाजली इतकेच. पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच!
पंतप्रधान मोदी यांनी एक जोरकस मुलाखत एकाच वृत्तवाहिनीला दिली आहे. मुलाखत मोजून 95 मिनिटांची असल्याचे बोलले जाते. पंतप्रधानांची मुलाखत मोठय़ा कालखंडाने येत असल्याने ‘चर्चा तर होणारच.’ तशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी होती. मोदी यांनी एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. पंतप्रधानांनी जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. तो चुकीचा आहे. राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली काय? सध्या राममंदिराचा विषय जोरात आहे. मंदिराबाबत मोदी एखादी महत्त्वाची घोषणा करून अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा वनवास संपवतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदी यांनी नेमकी विरुद्ध भूमिका घेतली आहे. राममंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह शिवसेनेची होती. मोदी यांनी ती साफ ठोकरून लावली आहे. मोदी म्हणाले, काही झाले तरी अध्यादेश काढणार नाही. राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. मोदी यांनी हे परखडपणे सांगितले ते बरे झाले व गेल्या चार-पाच वर्षांत  ते प्रथमच खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. इतर अनेक विषयांना त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours