जालना : 'युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे. त्यामुळे केंद्र तयार असणे आणि नसणे, यामध्ये फार काही विशेष नाही', असा मोठा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर दानवे यांनी युतीबद्दल खुलासा केल्यामुळे तासाभरात राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या लातूर येथील मेळाव्यात युतीबद्दल केलेल्या विधानानंतर भाजप आणि शिवसेनेत कमालीचे संबंध ताणले गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी तर 'युतीचा विषय खड्यात गेला', असं सांगितलं होतं. परंतु, दुसरीकडे भाजप नेते युतीवर ठाम आहे.
जालन्यात पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी युती होणारच असं सांगितलं आहे. "युतीचा फॉर्म्युला हा ठरलेला असून केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची आहे', असा दावाच त्यांनी केला आहे. तसंच,'युतीसाठी आम्ही शेवटपर्यंत आमच्याकडून प्रयत्न करणार फक्त निर्णय शिवसेनेला घ्यायचा',हे सांगायलाही ते विसरले नाही.
उद्धव ठाकरेंना इशारा
उद्धव ठाकरे काल बुधवारी बीडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या सभेत, 'रावसाहेब दानवे यांना आता रडवण्याची वेळ आली आहे',अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या तऱ्हेची वैयक्तिक टीका करतात त्यावरून त्यांची पातळी समजते. ते सगळ्यांवर टीका करतात, पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री तसंच माझ्यावरही टीका करतात हे योग्य नाही. शब्द माझ्याकडेही आहे, मलाही बोलता येतं', असा इशाराच  दानवेंनी दिला. तसंच 'घोडा मैदान सामने है', सगळ्यांना चारही मुंड्या चित करणार, हे मी प्रत्येक निवणुकीत केलं आहे आणि यावेळेलाही करेल,' असा दावाही त्यांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours