नवी दिल्ली, 31 जानेवारी: आगमी लोकसभा निवडणुकीत कोणाला सत्ता मिळणार यावर विविध तर्क लढवले जात आहेत. अनेक सर्व्हेतून अंदाज व्यक्त केले जात आहेत. केंद्रात पुन्हा मोदींना संधी मिळेल की राहुल गांधी काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून देतील यावर अनेक जण मत व्यक्त करत आहेत. या दोन्ही शक्यताबरोबरच बिगर भाजप अथवा बिगर काँग्रेस आघाडी सरकार तयार करेल का हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातून पक्षाला त्याची भरपाई करता येणार आहे.
या सर्व्हेनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAच्या मतांची टक्केवारी 4.4 टक्क्यांनी घटून ती 38.9 टक्क्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. तर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPAच्या मतांच्या टक्केवारीत 4.1 टक्के वाढ होऊ शकते. गेल्या निवडणुकीत 336 जागा जिंकणाऱ्या NDAला यावेळी 252 जागाच मिळतील असे या सर्व्हेतून समोर आले आहे. त्याच वेळी UPAच्या जागा वाढून त्या 147पर्यंत जातील. तर अन्य पक्षांना 144 जागा मिळतील. या आकडेवारीचा विचार केल्यास गेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या NDAला यंदा बहुमतापासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे. 
उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करणार कमाल
दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो असे म्हटले जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या राज्यात असलेल्या लोकसभेच्या 80 जागा होय. 2014मध्ये NDAने उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. अर्थात यावेळी समजावादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी झाल्याने त्यांना 51 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार यंदा NDAला राज्यातून केवळ 27 जागाच मिळू शकतील. धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा देखील काँग्रेसला केवळ दोन जागाच मिळतील असे या सर्व्हेत म्हटले आहे. 
महाराष्ट्रात NDAची जोरदार कामगिरी
जर आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातील 48 जागांपैकी NDAला सर्वाधिक 43 जागा मिळू शकतील. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास 2014च्या तुलनेत त्यांची टक्केवारी 2.2 टक्क्यांनी वाढून ती 53.5 टक्क्यांवर पोहोचेल. राज्यात UPAला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागू शकते. जागांचा विचार करता भाजपची महाराष्ट्रातील कामगिरी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. लोकसभेच्या दोन जागा असलेल्या गोव्यात NDAला एक तर UPAला एक जागा मिळू शकते. 
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मिळणार अधिक जागा
सर्व्हेनुसार भाजपला पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळतील. 2014मध्ये बंगालमध्ये दोन जागा मिळणाऱ्या भाजपला यंदा 9 तर ओडिशामध्ये 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही राज्यात भाजपने मोठा जोर लावला आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours