मुंबई, 21 फेब्रुवारी : 'पाकिस्तानला एकटे पाडण्याची कूटनीती वगैरे ठीक आहे, पण एकटा मसूद अजहर हिंदुस्थानला त्रास देतोय. त्याचा कायमचा नाश करा, की मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत त्या कारवाईची वाट पाहायची?' असा सवाल करत पुलवामा हल्ल्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेनं केंद्र सरकारकडे केली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'हिंदुस्थानवर शस्त्र उचलण्याआधी तुमचे मनगट शिल्लक राहील काय ते बघा, असे अमेरिका किंवा फ्रान्ससारखी राष्ट्रे ठामपणे पाकिस्तानला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कुणाला सच्चे मित्र वगैरे मानायला तयार नाही,' असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं सरकारला फटकारलं आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख?
पुलवामा हल्ल्याची शाब्दिक प्रतिक्रिया हिंदुस्थानने दिली आहे. आपल्याकडे शब्दांना तलवारीची धार असते. काहींच्या मते आमच्या शब्दांत स्फोटकांची विध्वंसक ताकद आहे, पण खरंच अशी ताकद आहे की नाही, हे प्रत्यक्ष कृतीशिवाय कसे समजणार? सध्या पाकिस्तानला धडा वगैरे शिकविण्याची जोरदार भाषा सर्वच स्तरांवर सुरू आहे. विशेषतः सोशल मीडियावर या पद्धतीचे खूप मेसेज फिरत आहेत. मात्र त्याची तेवढीच चेष्टादेखील केली जात आहे. आता एक व्यंगचित्र समाजमाध्यमांत फिरते आहे. कॉटखाली भेदरून लपलेल्या आपल्या नवऱयास बायको बाहेर यायला सांगते आहे, ‘‘अहो, सोशल मीडियावरील तुमची वीरश्री आणि आवेशपूर्ण प्रतिक्रिया वाचून लष्करी अधिकारी तुम्हाला सैन्यात भरती करून घेण्यासाठी आले आहेत. बाहेर निघा बिळातून.’’ समाजमाध्यमातील ‘हाऊ इज द जोश’ हा असा आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सध्या समाजमाध्यमांवर खेळले जात आहे. हे युद्ध भाजप, मोदीविरुद्ध इतर सारे असे आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीची ही सुरुवात आहे. पुलवामा हल्ला व बलिदान हा अशा प्रचाराचा भाग होऊ नये. इराक, इराण, अफगाणिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या रक्ताची किंमत अमेरिकेतील त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली. हिंदुस्थानात दुर्दैवाने तसे होत नाही. झाले तर उलटेच होते. सैनिकांचे बलिदान व दहशतवादी हल्ले ही निवडणुका जिंकण्यासाठी एक पर्वणीच मानली जाते व संपूर्ण प्रचार त्या हल्ल्याभोवतीच फिरत राहतो. हे ज्या देशात घडते तो देश दुश्मनांशी मुकाबला कसा करणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्याची भाषा जोरात सुरू आहे. धडा शिकवा आणि मग बोला. पठाणकोट, उरी आणि आता पुलवामा असे हे इजा-बिजा-तिजा झाल्यावरही आपण फक्त धमक्याच देत आहोत. आमच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्प काय बोलतो? फ्रान्सचे विधान काय आहे? इराणसारख्या देशाने पाकिस्तानला खडे बोल सुनावल्यामुळे हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय कूटनीतीत कसा वरचढ चढला अशी आपण स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहोत.
Post A Comment:
0 comments so far,add yours