मुंबई, 20 फेब्रुवारी : कांदिवलीच्या काशिमीरा ठाकूर मॉलजवळ स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. हा स्फोट नक्की कशाचा होता यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तर स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी मॉलमधील संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. आज सकाळी 10 वाजता स्फोट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर प्लास्टिकचा बॉल फेकल्याने त्याचा स्फोटा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. तर या स्फोटाच्या आवाजाची तीव्रता कमी असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
क्राईम ब्रांच आणि एटीएसचं पथक अधिक माहितीसाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. सूत्रांच्या माहिती नुसार त्यात एक्सप्लोसिव असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बॉलला फटाक्यांप्रमाणे वात होती अशीही माहिती देण्यात आली आहे.
घटनास्थळावरून स्फोटकाचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. हा बॉल नेमका कोणी आणि का फेकला? त्यामागे काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours