मुंबई, 11 फेब्रुवारी : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आज पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेनं भाजपवर आक्रमक हल्ला केला आहे. पण त्याचवेळी शिवसेनेला अजूनही युतीची अपेक्षा आहे का, असाही प्रश्न 'सामना'च्या अग्रलेखानंतर उपस्थित होत आहे.
'एका बाजूला 48 पैकी 43 जागा जिंकण्याची आरोळी ठोकायची व दुसर्‍या बाजूला शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्यावर ‘युती’ व्हायलाच पाहिजे असे बोलायचे. एकदा नक्की काय करायचे ते ठरवा,' असा सल्ला शिवसेनेनं भाजपला दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला अजुनही युतीची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दुसरीकडे, सामनातून भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचारही घेण्यात आला आहे.
'नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही'
'सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपच्या कारभारावर आसूड ओढला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours