पुणे, 11 फेब्रुवारी : भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण पुण्याच्या लोकसभा जागेसाठी भाजपकडून तरुण उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमकडून नवीन चेहऱ्यांबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाबाबत विचार सुरू आहे.
नवीन चेहऱ्यांची चाचपणी हा गिरीश बापट आणि अनिल शिरोळ यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. कारण या जोडीचं पुण्यातील भाजपवर कायमच वर्चस्व राहिलं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीत तिकीटासाठी रस्सीखेच झाल्याचीही मोठी चर्चा होती. पण आता मुख्यमंत्री या दोघांनाही बाजूला सारत नवी खेळी करणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यासाठी वेग आला आहे. 2014मध्ये असलेली मोदी लाट यंदा इतकी तीव्र नसल्याने उमेदवार निश्चित करताना पक्षाकडून अधिक काळजी घेतली जात आहे. पक्षाकडून मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा पराभव, महाआघाडी यामुळे भाजप नव्या चेहऱ्यांचा विचार करत आहे.
2014च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती होती. पण यावेळी शिवसेना सोबत असेलच याची खात्री नाही. त्यामुळे यंदा भाजपला आणखी जोर लावावा लागणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours