अहमदनगर, 31 मार्च : लोकसभेचा आखाडा सुरू झाल्यापासून विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात मुंडे भाऊ-बहिणदेखील काही कमी नाही आहेत. प्रत्येक सभेमध्ये ते एकमेकांवर टीका करताना दिसतात. यावेळीही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
'आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्य बोलता न येणाऱ्यांची पात्रता विचारत नाहीत' अशी टीका करत पंकजा मुंडे यांनी पार्थ पवारांच्या भाषणावरही टीका केली आहे. तर आमचेच बंधू पवारांची लाचारी करत असल्याचंही त्या म्हणाल्या.
'पार्थ सरस की रोहित असं प्रश्न त्यांना विचारल्यानंतर पवार महत्त्वाचे असल्याचं सांगतात. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ?' असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला. त्या नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीतील सभेत त्या बोलत होत्या.
'आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. पण लोक हुशार झाले आहेत. आमचे विरोधक म्हणतात हे बाहेरचे आले. यांना कळतं का कोण बाहेरचं आहे? आम्ही इथेच जन्मलो आहोत आणि लहानाचे मोठे झाले आहोत.' असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, 'बीड आणि अहमदनगरमध्ये शेजारी-शेजारी दोन डॉक्टर खासदार होणार आहेत. डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारात नाहीत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामधील कोणता नेता उत्कृष्ट आहे ? असा प्रश्न आमच्या भावाला विचारला. त्यावेळी ते म्हणाले. पार्थ आणि रोहित महत्वाचा नाही तर पवार महत्वाचे आहेत. अरे किती पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली. हे दिसत नाही. आणि इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours