माढा, 24 मार्च : सोलापुरातील भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदेना लोकसभा उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले आहे,' असा हल्लाबोल रोहन देशमुख यांनी केला आहे.
रोहन देशमुख यांना माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर द्यायला सुरुवात केली आहे. 'थेट शरद पवार यांनी माघार घेतली तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोधैर्य खचले. अशावेळी बळीचा बकरा म्हणून संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन पुढे करण्यात आले,' अशी टीका पंढरपूर दौऱ्यावेळी रोहन देशमुख यांनी केली आहे.
'माझ्या उमेदारीची चर्चा नाही'
'माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मला उमेदवारी देण्याची कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. पक्ष देईल ती जबाबदारी संभाळण्यास मी तयार आहे,' असं म्हणत रोहन देशमुखांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत उत्तर दिलं आहे.
दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसत आहे.
शरद पवारांनी डाव टाकत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मग भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदारीसाठी विचार केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष लढाईआधीच लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या रणजितसिंह यांची विकेट घेतली का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
Post A Comment:
0 comments so far,add yours