सोलापूर, 23 मार्च : भाजपने सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. यावेळी मात्र शरद बनसोडे यांना दूर करत भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे.
जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपने का दिली संधी?
उमेदवाराची निवड करताना प्रत्येक पक्ष मतदारसंघातील जातीय समीकरण पाहत असल्याचं दिसून येतं. सोलापूर मतदारसंघात मराठा, मुस्लीम आणि दलित मतदारांसोबतच लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांची संभाव्य उमेदवारी लक्षात घेता दलित आणि मुस्लीम मतं ही भाजपकडे येण्याची शक्यता कमी आहे. तसंच सोलापूर जिल्हातील भाजपचे नेतृत्वही जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यास अनुकूल होतं. या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या मतांचं गणित लक्षात घेता भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. 
सोलापूरची लढत तिरंगी

आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही या मतदारसंघात एंट्री होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवतील, असं वंचित बहुजन आघाडीच्या एका जाहीर सभेत एका नेत्याने घोषीतही करून टाकलं आहे. आंबेडकर यांनी अधिकृतपणे आपली उमेदवारी घोषित केली नसली तरीही ते या मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours