नाशिक, 1 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मूळचे नाशिकचे असणारे निनाद मांडवगणे बडगाममधील विमान दुर्घटनेत शहीद झाले.
शहीद निनाद मांडवगणे यांचं पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास नाशिकच्या अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
लखनऊ येथे असलेले निनाद यांचं कुटुंब नाशकात परतलं आहे. निनाद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चिमुकली मुलगी असा परिवार आहे.
वीरपत्नीची प्रतिक्रिया
'निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या' असा सल्ला शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे वीरपत्नीने दिला आहे. तसंच 'आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये' अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours