मुंबई, 18 एप्रिल- कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी डोंबिवलीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत प्रचार केला. विशेष म्हणजे यात शिवसेना, भाजप, मनसे आणि काँग्रेस मधील स्थानिक नेत्यांचाही सहभाग होता. गणेश नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या शैलीचंही कौतुक केलं, तर मोदी सरकारवर निशाणा साधला.
कल्याण लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर शिवसेना-भाजपचं मोठं आव्हान आहे. एकीकडे शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रचारफेऱ्या काढत असताना राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी मात्र वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिलाय. आज डोंबिवलीतल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हेदेखील पूर्णवेळ बाबाजी पाटील यांच्यासोबत उपस्थित होते. डोंबिवलीतले अनेक मातब्बरांची यावेळी भेट घेण्यात आली. आपण ज्यांची भेट घेतोय, ते आपल्यासोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत. आज ते दुसऱ्या पक्षात असले, तरी आपल्या विचारांच्या विरोधात ते जाणार नाहीत, तसंच लाचारी सोडून स्वाभिमान जिवंत ठेवण्याची ही मोठी संधी आहे, तिचं नक्कीच सोनं होईल, असा विश्वास यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours