कल्याण: शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या बंडखोरीवर एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांची अवस्था कुत्र्यासारखी, ना घरका ना घाटका अशी' अशा कठोर शब्दात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे.
कल्याण पश्चिमेत भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली हकालपट्टी मान्य आहे. मात्र, भाजप खासदार कपिल पाटील यांना कायम विरोध असणार अशी स्पष्ट भूमिका भिवंडी लोकसभाचे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी मांडली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर सुरेश म्हात्रे यांच्या मानकोली नाका इथल्या ऑफिसवर शेकडो कार्यकर्त्यांनी धाव घेतली.
या बाबत सुरेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, उद्धव ठाकरे यांचा निर्णय मला मान्य आहे. मात्र, शिवसैनिकांवर गेल्या 5 वर्षांपासून भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात मी आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना पाठिंबा देणार नाही' असं सुरेश म्हात्रे म्हणाले आहेत. तर यासंदर्भात 'मी माझी भूमिका येत्या शुक्रवारी मांडणार' असल्याचंही सुरेश म्हात्रे म्हणाले आहेत.
सुरेश म्हात्रे यांच्या बंडामुळे शिवसैनिक काय भूमिका घेणार आणि भाजपला किती मोठा धक्का बसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours