मुंबई, 30 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सामना संपादकीयमधून जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.'  विशेष म्हणजे यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा अन्य तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरू शकतात, असंही म्हटलं. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

''काँग्रेसविरोधात पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला. आताही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून काही नवे घडवता येईल काय? या भूमिकेत ते आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. दिल्लीची आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असे वातावरण देशात नाही!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सामना संपादकीयमध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

- शरद पवार यांनीही आता पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत एक विधान करून गोंधळ उडवण्याचा प्रयोग केला. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात.

- या पवारांच्या विधानाने खळबळ कमी आणि खळखळ जास्त झाली. खळबळीचा प्रश्नच नाही, पण काँग्रेसच्या गोटात मात्र अपेक्षेप्रमाणे खळखळ झाली.

- पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना शरद पवारांचा पाठिंबा नाही असे नाराजीचे सूर उमटले. बाजारात तुरी असतानाच काँग्रेस महाआघाडीत पंतप्रधानपदावरून ‘मारामारी’ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours