भुवनेश्वर, 5 मे : ओडिशामध्ये फानी चक्रीवादळामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील जवळपास 10,000 गावं आणि 52 शहरी भागांमध्ये नागरिकांसाठी मदत आणि पुनर्वसनाचं कार्य सुरू आहे. या वादळामुळे जवळपास एक कोटी नागरिकांना फटका बसला आहे. मयूरभंज, पुरी, भुवनेश्वर, जाजपूर, नयागड आणि केंद्र पाडा येथील रहिवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे.
हे चक्रीवादळ सर्वाधिक शक्तिशाली मानलं जात आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास फानी चक्रीवादळ पुरीच्या किनारपट्टीवर धडकलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताशी 240 किलोमीटर वेगानं पुढे सरकणाऱ्या या वादळामुळे शुक्रवारी ओडिशामध्ये सोसाट्याचा वार आणि मुसळधार पाऊस पडत होता.
यामुळे येथील कित्येक घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यापूर्वी 1999 साली सुपर सायक्लोन धडकलं होते, यामध्ये तब्बल 10 हजार जण मृत्युमुखी पडले होते.
फानी चक्रीवादळासंदर्भात अगदी तंतोतंत बरोबर अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा UN ने गौरव केला आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत आणि बरोबर वर्तवल्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले, असं राष्ट्रसंघाने म्हटलं आहे. फानी चक्रीवादळ नेमकं कुठे धडकणार, किती वाजता धडकणार, त्याची तीव्रता काय असणार, दिशा काय असणार याचा अगदी बरोबर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सुमारे 10 लाख लोकांना योग्य वेळेत सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं. रेल्वे आणि विमान सेवांनी या अंदाजानुसार आपल्या वेळापत्रकात बदल केले आणि ठराविक मार्गावरील वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे प्रवासी अडकून पडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत आणि मोठे अपघातही वाचले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours