शिरूर, 4 मे : लोकसभा निवडणुकी मतदानानंतर नगरमध्ये सुजय विखेंच्या नावापुढे निकालाआधीच खासदार लावलं जात असल्याची लग्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसाच काहीसा प्रकार आता शिरूरमध्येही पाहायला मिळत आहे. शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपल्या विजयाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 
अमोल कोल्हे यांनी नारायणगाव इथं यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्यात हजेरी लावली. 'विद्यमान खासदारांच्या पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे आपण उशिरा पोहचलो, असं म्हणत सुरुवातीला कोल्हे यांनी शिवसेना खासदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना टोला लगावला. त्यानंतर 'निकाली कुस्तीत तुमचीच ताकत दिसेल. पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल. नारायणगावच्या यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल,' असं म्हणत पुढच्या यात्रेत याठिकाणी खासदार म्हणून आपणच असेल असा आत्मविश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला. 
शिरूरमध्ये मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 साली झालेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. आढळराव पाटील यांनी तब्बल 1 लाख 79 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 
2014 मधील लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी आपला गड राखत राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांना तब्बल 2 लाख 98 हजार मतांनी धूळ चारली होती. यावेळी देशभरात असलेल्या मोदी लाटेचा फायदा आढळराव यांनाही झाला होता. कारण या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours