गडचिरोली, 4 मे : कुरखेडा येथील भूसुरुंग स्फोटासंदर्भात अखेर माओवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रदिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. याबाबत आता 'कंपनी चार'चा प्रभारी प्रभाकर, भास्कर आणि दिनकरसह इतर अज्ञात माओवाद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रदिनी माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला. कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. 

गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते. त्यातल्या 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले होते.

माओवाद्यांनी असा रचला कट

माओवाद्यांनी 25 एप्रिलच्या आधीपासूनच या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर जवानांवर हल्ला करून, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या चार-पाच दलांनी एकत्र येऊन एक कंपनी तयार केली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापूर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत माओवाद्यांपर्यंत पोहोचत होती.

माओवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्या मध्ये असलेलं घनदाट जंगल आहे आणि इथे केवळ माओवादीच जातात.

सी60 कमांडो जवानांवर हल्ला करताना या परिसरात 150 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. स्फोट घडवल्यानंतर जवानांच्या मृत्यूची खात्री करुनच नक्षली पसार झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours