मुंबई17 सप्टेंबर : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सोमवारी नवी मुंबईत दाखल झाली होती. बेलापूर आणि ऐरोली विधानसभेत यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकीनंतर विजयी मेळावा घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नवी मुंबईत दोन विधानसभेपैकी बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे युतीत नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा भाजपा तर बेलापूर विधानसभा सेना लढवणार असल्याचं समोर आल्याने याचा मोठा फटका गणेश नाईक यांना बसणार आहे. गणेश नाईक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते बेलापूर विधानसभेतून लढतील अशी चिन्हं होती. दुसरीकडे भाजपाच्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे.
भाजपच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमामधून गणेश नाईकांचा काढता पाय
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना नवी मुंबईतल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात धक्का बसला आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आले होते. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाईक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा गढ असलेल्या नवी मुंबईत महिल्यांदाच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आले होते. त्यामुळे गणेश नाईक कार्यक्रमाला हजर होते. मात्र, त्यांना व्यासपीठावर न बोलवल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी कार्यक्रमामधून काढता पाय घेतला. गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने ते लवकर बाहेर पडले असं सांगण्यात आलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours