मुंबई, 17 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेतला आहे. 'पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?', असा सवाल उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
- ‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,’ असे शरद पवार म्हणतात.
- हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? स्वत: पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेस पक्षात बंड केले. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरू आहे.
- शिवसेना किंवा भाजपातील काही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दाची ऐशी की तैशीच केली होती.
- राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही.
- पवारसाहेबांचे असे सांगणे आहे की, ‘‘मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या 52 वर्षांत 27 वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत असे सांगतात तेव्हा गंमत वाटते!’’ पवारांना याबाबत गंमत वाटणे हीच मोठी गंमत आहे
- पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours