मुंबई, 2 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी 4 मे रोजी मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपत नाही तोच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 
राष्ट्रवादीच्या या बैठकीला लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना देखील बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला जाणार आहे.
दुष्काळ दौऱ्यालाही सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभेसाठीचं मतदान संपताच सोलापुरातील सांगोला इथं भेट दिली. यावेळी त्यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यलमार मांगेवाडीतल्या ग्रामस्थांनी यावेळी जनावरांचं दूध किती घटलंय याची आकडेवारीच सांगितली. 
या गावातलं दूध संकलन दुष्काळामुळे 2 हजार लिटरवरुन थेट 200 लिटरवर आलं आहे. त्यात सध्या दुष्काळी चारा छावण्यांमध्ये एका कुटुंबातल्या फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश दिला जात आहे. ही अट काढून टाकावी, तसंच पंधरा किलोपेक्षा जास्त चारा मिळावा, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी पवारांकडे केल्या आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours