जालना- दुष्काळाने होरपळत असलेल्या जालना जिल्ह्यात बुधवारी आणखी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रल्हाद पाराजी तारख असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद पाराजी तारख अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथील रहिवासी होता. प्रल्हाद तारख याने आज शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह वडिगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आला आहे. आत्महत्येमागच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे प्रल्हाद याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
बदनापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून
दुसरीकडे, बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात घरात झोपलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष कुरधने (22) असे या मयत युवकाचे नाव आहे. मारेकऱ्याने संतोषच्या डोक्यात धारदार शस्त्राचे वार केले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून रामखेडा येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहे. संतोषचे आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान याचवेळी स्वतःच्या घरात एकट्याच झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours