मुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्थान मिळालं आहे. पण आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
'जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार, यालाच म्हणतात उद्धव ठाकरे,' अशी जहरी टीका निलेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे. दुसरीकडे, आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 'सर्व निवडणुका मोदींच्या नावावर लढण्यापेक्षा शिवसेना हा पक्षच भाजपमध्ये विलीन करा,' असा टोला नितेश यांनी लगावला आहे.
निलेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी राणे कुटुंबाला धूळ चारली आहे. त्यामुळेच हताश झालेल्या निलेश राणेंनी अशी खालच्या पातळीवरील टीका केली,' असा पलटवार शिवसेनेनं केला आहे. 
दरम्यान, शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथही घेतली आहे. अरविंद सावंत यांना संधी दिल्यानंतर शिवसेनेतील काही वरिष्ठ खासदार नाराज झाल्याची चर्चाही रंगत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours