मुंबई, 30 जून : मुंबई आणि कोकण परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई आणि मुंबईजवळील परिसरात दोन दिवसांतल्या मुसळधार पावसानं जून महिन्याची सरासरी गाठली आहे. शनिवारी दिवसभरात मालाड परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली. संततधार पावसामुळं मुंबईत तीन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवानं त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं.
मुंबई आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अनके सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे. अर्थात मुंबईकरांना होणाऱ्या या अडचणीचा सामना आणखी 24 ते 48 तास करावा लागू शकतो.
गेल्या 24 तासापासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावामध्ये पाणीसाठा वाढला आहे. तानसामध्ये 60 मिमी, विहार 209 मिमी, तुळशी 143 मिमी, मध्य वैतरणा 78 मिमी तर मोडकसागरमध्ये 69 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईतील पाऊस आणि बंगालची खाडी
पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाला आहे. हवेचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. तर 4 जुलैनंतर पुन्हा एकदा उत्तर कोकणात पावसाला सुरुवात होऊ शकते. स्कायमेटच्या अंदानानुसार बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours