जळगाव, 30 जून : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून जावं लागणं आणि पुन्हा परत येण्याची संधी न मिळणं याची खंत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या भाजपच्या जळगावमधील बैठकीतही याचाच प्रत्यय आला. या बैठकीत खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचं श्रेय इथं बसलेल्या कुणाचं किंवा मुख्यमंत्र्यांचं नाही,' असा टोला लगावत खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.
दरम्यान, खडसे यांना मंत्रिपदापासून दूर व्हावं लागल्यानंतर अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणातही त्यांच्या मनातली सल व्यक्त झाली. 'राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. तिथून ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले,' असं सांगत ते नशीबवान असल्याचं सांगायलाही खडसे विसरले नाहीत.
Post A Comment:
0 comments so far,add yours